﻿स्तोत्र.
62.
दाविदाचे स्तोत्र माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते. 
तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही. 
झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या, एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? 
त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात; त्यांना लबाड बोलण्यास आवडते; ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात. 
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे. 
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही. 
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे. 
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे. 
खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत; वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत. 
दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका; 
देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे. 
हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे. कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. 
