﻿स्तोत्र.
70.
दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. 
जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; 
जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत. 
जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. 
पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. 
